विलिनीकरणामुळे वाढला ताण, ग्राहकांना रांगेत तासंतास उभे राहण्याची वेळ

Foto

औरंगाबाद- राष्ट्रीयकृत बँकांच्या अडेलतट्टू धोरणाने ग्राहकांची अक्षरशः पिळवणूक होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणानंतर मध्यवर्ती समजल्या जाणार्‍या या बँकेवर आलेला ताण पाहता ग्राहकांची त्रासातून सुटका होणार नसल्याचे दिसून येत आहे.

 

गेल्या वर्षभरात देशभरातील तब्बल २८ बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या राष्ट्रीय बँकेत विलिनीकरण करण्यात आले. यात सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ हैदराबादचाही समावेश आहे. विलिनीकरणानंतर स्टेट बँकेच्या खातेदारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. खातेदारांची संख्या वाढली तरी बँक शाखांचा विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यामुळे आहे त्या शाखांवर दबाव वाढला. बँकांच्या धोरणाचा अडथळा आणि नियमांच्या कचाट्यात सापडलेले कर्मचारी, वाढत्या कामाने दबून गेले आहेत. मोठ्या आणि राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच बँकांच्या शाखांची वाढ आणि ग्राहकांच्या सुविधांचा अभ्यास करायला हवा होता. मात्र, तसे झालेले नाही. शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या संख्येच्या प्रमाणात शाखा उघडलेल्या नाहीत याचा मोठा फटका ग्राहकांना बसतो आहे. 

 

औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या ४०० हून अधिक शाखा आहेत. मात्र, या शाखा पुरेशा नाहीत. शहरातही बँक शाखांची संख्या कमीच आहे. ग्राहकांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात अजूनही किमान २०० शहरात उघडल्या जाऊ शकतात;पण बँक प्राधिकरण हा निर्णय घेण्यास तयार नाही. शहरातील प्रत्येक बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाच्या भाराभर योजना, कर्ज प्रस्ताव, नवे खाते आणि रोजची देवाण-घेवाण याचा मोठा ताण बँक कर्मचार्‍यांवर आला आहे. अनेक बँकांमध्ये कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने ग्राहकांना तासंतास ताटकळत बसावे लागते. ऑनलाईन यंत्रणा अनेकदा ठप्प होते. त्यामुळे कामकाज करताना अडचण होत आहे. 

 

बँकांच्या विलिनीकरणानंतर एसबीआयकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. त्याच वेळी बँक ग्राहकांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. सरकारने अधिकाधिक ग्राहक बँकांशी जोडले जावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. मुद्रा बँक योजना, शून्य पैशात खाते यासह ङ्गजनधनफ योजना राबविण्यात आली. जनधन योजनेकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित झाले. एकीकडे बँकेकडे ग्राहक आकर्षित करण्याचे धोरण तर दुसरीकडे बँक शाखांचा विस्तार न करण्याचे धोरण, अशा कचाट्यात ग्राहकांची कुचंबणा होत आहे. या महिन्यात तर ग्राहकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागले. दिवाळीसारखा सण आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुट्ट्या ग्राहकांसाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. अनेकदा एटीएम मध्ये पैशांचा खडखडाट असतो. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. शहरातील नव्या विस्तारलेल्या भागांसाठी बँकेच्या नवीन शाखा उघडणे क्रमप्राप्‍त ठरू लागले आहे. नव्या वसाहतीमधील ग्राहकांची गर्दी जुन्या शाखांमध्ये वाढत असल्याने कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे शहरातील नव्या भागात किमान ४० ते ५० नवीन शाखा उघडणे अत्यावश्यक बनले आहे. ग्राहकांना चांगली सुविधा मिळाली नाही तर ग्राहक खाजगी बँकांकडे वळणार यात शंका नाही.